नेहमीप्रमाणे एका स्त्री जातकाचा त्यांच्या मुलाच्या करिअर मार्गदर्शनासाठी फोन आलेला. मी सविस्तर त्याना सगळी माहिती ही दिली पण बोलल्या सर, एक प्रश्न मनात आहे विचारू शकते का ?
माझा होकार मिळताच त्यानी सांगायला सुरुवात केली.
जातक: सर, खरंच एखादा माणूस किंवा त्याची जन्म कुंडली पूर्णपणे टाकाऊ असते का ? असं सुद्धा पाहता येते का ज्योतिष शास्त्रात ?
मीच आश्चर्यचकित! 🙄
हा प्रश्न मला अगोदर ही कुणीतरी विचारलेला मला आठवला पण ते जातक जास्त शिकलेले नव्हते तर ह्या जातक उच्च विद्याविभूषित, स्वतःची इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या व एक फॅक्टरी सुद्धा मालकीची असणाऱ्या अशा होत्या. म्हणजे खरंच असं कोणता ज्योतिर्विद जातकाला सांगत असावा का ? “एकदम टाकाऊ ?”
मी: दुसऱ्याच्या फाटक्यात पाय अडकवायला मला बिलकुल आवडत नाही. ज्याने त्याने स्वतः ला वाटेल ते करावे कारण जशी कर्म माणूस करतो त्याची फले ही यथावकाश त्यालाच भोगावी लागत असतात. तरीही न राहवून मी विचारलेच, मॅडम कोणी सांगितलं असं ?
जातक: नाव नाही सांगत सर पण ते पण खूप मोठे ज्योतिषी आहेत असे सांगतात. ते म्हणत होते की त्यांच्याकडून ज्योतिष मार्गदर्शन घ्यायला एकतर परदेशी लोकं त्यांच्याकडे येतात किंवा खास विमानाने त्याना परदेशात बोलवतात.
मी समजलो काय समजायचे ते.
जातक: झालं असं, मी नी माझा भाऊ काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो त्याची पत्रिका घेऊन.
तेव्हा ह्या महाशयांनी सांगितलं की ही पत्रिका फार टाकाऊ आहे. हा माणूस आयुष्यात काहीच करू शकणार नाही. बिचारा माझा भाऊ त्या धक्क्यातून आता कुठे सावरलाय नाहीतर त्याच्या डोक्यात तेच भूत नाचत होतं.
मी: अरेरे ! असं त्या ज्योतिषाने सांगायला नव्हतं पाहिजे.
🔰काही जुन्या ग्रंथात उल्लेख सापडतो की जर दशमात एकही ग्रह नसेल किंवा व्दितीय-षष्ठ-लाभ स्थानाचा शुभ संबंध नसेल तर तो माणूस आयुष्यात काहीच कमवत नाही. उनाडक्या करत हिंडतो. पण जसेच्या तसे सांगणे केव्हाही चूकच.
⚡प्रत्येक ज्योतिर्विदाने थोडे तरी तारतम्य ठेवून भविष्य कथन करणे गरजेचे असते नाहीतर नाहक एखाद्या जातकाचं नुकसान होऊ शकते. तसेही सगळ्याच बाबतीत ज्योतिष शास्त्र १००% खरं कधीच येत नाही. (ह्या वर अधिक माहितीसाठी वाचकांनी माझा अगोदरचा लेख अवश्य वाचावा.) मग सरळ टाकाऊ लेबल एखादा कसा काय लावू शकतो ?
☀ ज्योतिष म्हणजे ज्ञानाचा दिपच !
जातकाच्या भविष्यात काय होणार आहे त्याचा आढावा घेऊन अशुभतेची तीव्रता कशी कमी करता येईल हे सांगणे मुख्यतः ज्योतिर्विदाचे काम.
अप्स-डाऊन कुणाला नसतात ?
एखाद्याची नोकरी सुटणार असेल तर त्याला: बाबारे ! पडेल ते काम कर ….सोबत दुसरी नोकरी पण शोध. खर्च- कर्ज वाढवू नकोस किंवा एखाद्या यशदायी धंदा कर असा सल्ला मी तर माझ्या जातकांना देत असतो. कारण काही घटना तुम्ही कितीही उपासतापास केलेत अथवा कितीही उपाय केलेत तरी टळत नाहीत मग जातकाला दुःख कवटाळून बसायला सांगायचं की पुढचे आवश्यक प्रयत्न करायला जातकाला उद्युक्त करायचे हे ज्योतिषाला समजायला नको का ?
मॅडम, प्रत्येक मनुष्य कुठला तरी गूढ संकेत घेऊन जन्माला येत असतो. एकाधे विशिष्ट कार्य भगवंतानी त्यावर सोपवलेले असते. परंतु काही वेळ त्याला ते कार्य काय आहे हेच लवकर सापडत नसते म्हणून काय तो टाकाऊ होतो ? कधीच नाही.
प्रत्येक माणसाला कुठलीतरी कला येतेच येते. कशात तरी तो इतरांपेक्षा उजवा असतोच मग त्याची जन्म पत्रिका सुद्धा टाकाऊ कशी असेल ?
सूज्ञ माणसाने सरळ अशा “टाकाऊ प्रेडिक्शनकडे”😃 चक्क कानाडोळा करावा व आपला प्रयत्न चालूच ठेवावा.
आपल्याला काय वाटते खरंच एखादी पत्रिका टाकाऊ असते ?