जातकाला ईश्वर उपासने कडे वळविणे हे मुख्यतः ज्योतिर्विदाचे मुख्य काम असते असा माझातरी समज आहे. त्याने आदल्या जन्मीचे पाप कर्माने जातकाला भोगायला आलेल्या दुःखद कष्टांचे थोड्याफार प्रमाणात जोर कमी होत असतो तर न टाळता येणार कर्मे भोगताना त्याला ईश्वर नामाची जोड मिळाल्याने वाईट काळ जातकांचे मन सुसह्य करते. त्याला परिस्थितीत तटस्थ राहून लढायला बळ मिळते. तर पुण्य कर्मांमुळे मिळालेल्या संपत्तीचा, सत्तेचा जातकाच्या हातून भविष्यात होणारा दुरुपयोग टाळून पुढील जन्मात त्याला परत परत अशुभता भोगायला लावण्यापासून थांबवता येते.
एकंदर कर्मांचा balance राखून जातकाला मोक्षाच्या मार्गाकडे न्यायला ईश्वर उपासनेनेच शक्य होते.
परंतु आता पर्यंत अभ्यासलेल्या विविध जातकांच्या पत्रिकेनुसार असेही निदर्शनास आले आहे की कधी कधी दशे प्रमाणे चांगला आर्थिक उन्नतीचा काळ असून सुद्धा जातकाला तेव्हढी आर्थिक प्रगती करता येत नाही, असे का होत असावे ?
कारण शास्त्रात सांगितल्या प्रमाणे तो उपासना तर करतो पण कुठली उपासना करावी हा सखोल अभ्यासाचा मुद्दा आहे.
आता बघा हा..
एखाद्या जातकाने आवड म्हणून गायत्री उपासना अगदी मनोभावे सुरू केली, पुढे पुढे त्यात वाढ केली तर त्याला असे अनुभवास येते की त्याची आर्थिक प्रगती हळू हळू कुंठत चालली आहे. आता तो नेहमी करणाऱ्या व्यवसायात काही चुकीचे निर्णय घेतो का तर ते ही नाही, त्याचे श्रम कमी पडतात का तर ते ही नाही.. मग असे का होत असेल ?
मुळात गायत्री उपासना मानवाला भौतिक सुख समृध्दी देण्यासाठी नाहीच जसे की तुम्ही उजव्या सोंडेच्या श्री गणेशा कडे भौतिक सुख मागितले तर तो देणार नाही परंतु तुम्ही बुध्दी – शिक्षणात प्रगती ह्या गोष्टी मागितल्या तर तुम्हाला नक्की देईल कारण त्या उजव्या सोंडेच्या श्री गणेशाची ती मूळ प्रवृत्तीच आहे.
तसेच गायत्री उपासना तुम्हाला नश्वर मनुष्य देहाकडून ईश्वरी सत्तेकडे घेऊन जाणारे एक माध्यम आहे. जशी जशी तुमची उपासना दृढ होत जाईल तसे तसे तुम्हाला ती ईश्वरी भेटीस अडथळा ठरू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना तुमच्या पासून हळू हळू अलिप्त करत जाईल.
काही वेळेस स्वकीय आप्तजणांची ताटातूट, तुमचा व्यवसाय, पैसा, संपत्ती, सत्ता ह्या सगळ्यांपासून हळू हळू तुम्हाला दूर घेऊन जाईल व सरतेशेवटी तुम्हाला मोक्ष मिळवून देईल.
जास्त उपासना करणारा माणूस व्यवसायात कधी कधी लागणारी काही प्रकारची हुशारी, खोटं बोलणे ह्या गोष्टी करूच शकत नाही त्या मुळे तो व्यवसायात मागे पडू शकतो हे आपण जाणतोच.
म्हणून जर आपणही आर्थिक उन्नती साठी गायत्री उपासना जर करत असाल तर जाणकार व्यक्तींकडून नीट विचारून घ्या नाहीतर वरील फळे भोगने अपरिहार्य आहे.