हल्ली अशी एक पोस्ट माझ्या वाचनात आली. वाचून खूप वाईट वाटलं म्हणून लिहितो, पटलं तर घ्या नाहीतर सोडून दया.
एका वाचकाने पृच्छा केली की कुणी चांगलं भविष्य सांगणारे आहे का कोण्या स्थळी?
खूप कंमेंट्स आल्या होत्या.
कुणी म्हणतं होतं पारंपारीक फलज्योतिष चांगलं, कुणी म्हणत होतं कृष्णमूर्ती पद्धती उत्तम तर कुणी रमल विद्या तर कुणी हस्त रेषा.
जो तो आपल्या अनुभवाने बहुदा असा कंमेंट्स टाकत होता.
मित्रांनो अशी कुठलीच विद्या परिपुर्ण नाही भविष्य सांगण्यासाठी. जगात अंदाजे १५० प्रकारे भविष्य सांगण्याचे प्रकार आहेत. सर्व समाजात ही अशी माणसं असतातच. जसा आपला योग असतो तशीच माणसे आपल्यालाही भेटतात अगदी ज्योतिषी सुद्धा आणि ज्योतिषांना जातक सुद्धा.
“योग असल्याखेरीज योग्य मार्गदर्शन मिळत नसते हे ध्यानात ठेवा.”
प्रत्येक पद्धतीत काही ना काही गुण-दोष हे असतातच. म्हनूनच मी ही बऱ्याच पद्धतीचा वापर करून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मला कुठल्याच पद्धतीचे वावडे नाही. जे अनुभवास येईल तेच खरे.
काही जातक तर ही ज्योतिष विद्या (…..) गुरूंच्या कडे शिकली असेल तरच उत्तम पद्धतीने सांगता येते असे ही लिहितात. म्हणजे काय इतर गुरूंनी फक्त नुसतेच शिष्य घडवले असे म्हणायचे काय? त्या गुरूंची आपणास पूर्णपणे माहिती आहे का? हे अगोदर स्वतःलाच विचारावे.
जशी प्रत्येक पद्धती चांगलीच असते तसा प्रत्येक गुरू ही चांगलाच असतो.
नकळत कोणत्याही गुरूला मोठे करून आपण ह्या क्षणाला असणाऱ्या, होऊन गेलेल्या व भविष्यात होऊ घातलेल्या गुरूंची बेअदबच करत असतो. ह्यापेक्षा मोठे पाप नाही.
माझ्या वाचण्यात आल्या प्रमाणे जिवंत गुरूच फक्त काही ज्योतिष शास्त्र शिकवत नसतो तर एक गुरू त्यांच्या मरणोत्तर अवस्थेत ही काही शिष्याना ज्ञान देतच होते कदाचित अजूनही देत असतील ही. सांगली की कुठे एक गृहस्थ अतींद्रिय दैवी शक्ती वापरून फक्त भिंतीकडे बघून ही भविष्य सांगत असत.
मग काय त्यांचे तुम्हाला नाव माहीत नाही म्हणून ते उत्तम गुरू नव्हते की त्यांच्याकडे असणारी विद्या उत्तम नव्हती?
“माझ्या मते फक्त उपासनेने, मनाच्या निर्मलतेने, पुर्वसंचित असल्यामुळे व ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाची शास्त्रशुद्ध जर बैठक असेल तर कुणीही ज्योतिषी कोणत्याही पद्धतीने अचूक भविष्य सांगू शकतो.”
आपल्या जवळपास जो असेल, ज्याचा अनुभव आलेला असेल वा आपलं मन वाटेल, त्या ज्योतिर्विदाकडे नक्की आपण जावं मार्गदर्शन घेण्यासाठी. उगाच कुठल्याही पद्धतीचा उदो-उदो करण्यात काही अर्थ नाही.
प्रत्येक पद्धतीचा पाया हा एकच आहे. उद्दिष्ट एकच आहे. मग कशासाठी हा अट्टहास???