Ghar Genyasathi Kahi Jyotish Shastriya Tips ( घर घेण्यासाठी काही ज्योतिष शास्त्रीय टिप्स )

Spread the love

घर घेण्यासाठी काही ज्योतिष शास्त्रीय टिप्स:

नारळाच्या झावळ्या एकत्र करून बनवलेली लहानशी झोपडी असो किंवा उत्तम इंटेरिअर केलेला राजमहाल त्या सगळ्यांनाच आपण घर म्हणतो. 
राजाचा राजमहाल – गरिबांची झोपडी – मध्यमवर्गीय लोकांचा फ्लॅट असे वर्गीकरण मग त्यात सूरु होते.
वर्गीकरण करण्यासाठी फक्त एकच निकष असतो तो म्हणजे आपली “आर्थिक सुबत्ता”.
करोड खर्च करणाऱ्यास राजमहाल जसा भुलवतो अगदी तसाच आजच्या घडीला फ्लॅट. मग तो 1BHK असो किंवा फक्त 1RK असो.
जसा एखादा कमी पगारावरून जास्तच पगार मिळवण्याकडे कूच करतो अगदी तसाच प्रत्येक मनुष्य अगोदरच्या असणाऱ्या (मग ते वडिलोपार्जित असो किंवा स्वकष्टाचे)  घरापेक्षा मोठे घर घेण्यासाठी सतत धडपड करत असतो.
वाढते कुटुंब, बदलणाऱ्या गरजा, मुलांना द्यावेसे वाटणारे संस्कार, ऑफिस पासून जवळपास जागा असावी ह्या या ना त्या कारणाने मनुष्य प्राणी त्याला आवडेल असेच घर घेण्याचा प्रयत्न करत असतो.
पंचतारांकित हॉटेल मध्ये ही जी सुखासुखी झोप येत नाही ती फक्त आणि फक्त आपल्या स्वतः च्या घरातच येते. 
ज्यांचे स्वतः चे घर झालेले असेल त्याना माझ्या ह्या वाक्याचा अर्थ लगेच कळेल.
पण सगळ्यांच्याच नशीबी घर घेणे असते ?🤔
ह्याचे उत्तर नाही असेच आहे.
✍ ज्योतिष शास्त्रात कृष्णमुर्ती व भावनवमांश पद्धतीनुसार ज्यांच्या जन्मकुंडलीत चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी लाभ स्थानाचा कार्येश  असून मंगळ-शनी शी संबंधित असतो त्याच जातकाचे स्वतः चे घर किंवा जमीन होऊ शकते. 
मी आजपर्यंत असे अनेक जातक पाहिले आहेत की ज्यांच्याकडे खूप पैसे शिल्लक आहेत परंतु अद्याप स्वतः चे  घर मात्र काही झालेले नाही.
मग कधी कधी असे जातक कम्पनीने दिलेल्या घरात आयुष्यभर राहतात आणि नंतर मुलांनी घेतलेल्या घरात.
 
पण ह्यांच्या प्रिय पत्नीला मात्र ते “हे माझे स्वतः घर” असे बोलायची संधी कधीच देऊ शकत नाहीत ह्याची एक अबोल खंत ह्यांच्या मनात कायम सलत असते.
असेच एक जातक आयुष्यभर पोस्टमन ची नोकरी करताकरता ऑफिस च्या क्वार्टरस मध्येच रहात होते.
नुकतेच पनवेल मध्ये  भाड्याने रहायला आले होते त्याचे कारण की ऑफिस वाले काही त्या रूमची डागडुजी करून देत नव्हते म्हणून.
मुलगा परदेशात कामाला होता पण त्याचा पगार पाहिला तर कशासाठी तो परदेशी कामाला गेला हाच प्रश्न एखाद्याला पडावा इतका कमी पगार.
त्यात जातकांच्या डोक्यावर मणभर कर्जाचे ओझे. सोसायटी फंड मधून सुद्धा उसनवारी करून ठेवलेली. त्यात त्यांच्या मिसेसला मोठेपणा दाखवायची हौस .
मग पगार पुरणार तरी कसा घर घेण्यासाठी ?
त्यात नोकरीची अवघी ७ वर्ष सर्व्हिस बाकी होती आणि एक दिवस त्यानी मला प्रश्न विचारला की आमचे स्वतः चे घर होईल का ? कधी होईल ? कुठे होईल ?
त्या वेळेस मराठी माणसाने घर घ्यायचे असेल तर कल्याण- डोंबिवली किंवा मग अंबरनाथ येथेच घ्यावे अशीच  चित्रपटातुन सुप्त मार्केटिंग चालू होती.
अलबत! घराचे रेट पण तेथे स्वस्तच होते पण ह्यांना ऑफिस ला जायला सोपे पडावे ह्यासाठी मुबंई- नवी मुंबईतच घर असावे अशी जातकांच्या पत्नीची इच्छा.
☀ पत्रिकेत वास्तू होण्याचे योग प्रबळ होते तरी अजून घर झालेले नव्हते म्हणून एक अध्यात्मिक उपाय सांगितला, त्याचबरोबर काही टिप्स ही दिल्या.
अवघ्या ५ ते  ७ महिन्यात वास्तूशांतीचे आमंत्रण सिल्क चॉकलेटस व पेंढ्याच्या बॉक्स सहित आले. 😋
काही उपाय असे जगजाहीर करायचे नसतात म्हणून वाचकांना ते येथे सांगू शकत नाही परंतु सोप्या टिप्स मात्र देतो: 
🔰 गणपती व कुलदैवत उपासना वास्तू साठी  निश्चित फलदायी ठरते.
🔰 अगोदरचे कर्ज फेडण्यासाठी हवे ते प्रयत्न करा कारण नुसते स्तोत्र म्हणून कर्ज फिटणार नाही तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढवूनच कर्ज फिटेल.
🔰 खर्चावर लगाम घाला. प्रदर्शन करण्यापेक्षा जसे आहे तसेच रहा.
🔰 आपल्या पत्रिकेत जर घर घेण्याचे खराब योग असतील तर कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावाने घ्या.
🔰 लग्न आणि घर ह्या अशा गोष्टी आहेत की त्यात नाही म्हटलं तरी खर्चाचा आकडा वाढतोच. म्हणून आपल्या कुवतीपेक्षा जरा कमीच बजेट चं घर घ्यावे म्हणजे मग होम लोन चे हफ्ते फेडायला त्रास होत नाही.
🔰 जशी लग्नात आपण इतरांची गरजेच्या वेळेस मदत घेतो अगदी तशीच मदत तुम्ही न लाजता घर घेताना मागितली तर तुमचे नाव काही कमी होत नाही कारण ती परतफेड करण्याच्या बोलीने घेतलेली असल्याने तो निव्वळ व्यवहार असतो. मग लाजयचे कशाला ?
⚡असा एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याने लग्न व घर घेताना कुणाची कुठल्याही प्रकारची काहीच मदत घेतली नसेल.
🔰 थोडे तरी कर्ज घर घेण्यापूर्वी काढून ते वेळेवर परतफेड करावी जेणेकरून आपला सिबील स्कोअर चांगला राहून होम लोन बँक आपल्याला लगेच कर्ज देतील.
🔰 कामावर दांड्या ही कमी मारा आणि जास्तीत जास्त पैसे वाचवायचा प्रयत्न करा.
🔰 आपली बँकेतील सेव्हिंग, इन्शुरन्स, पत्नीचा किंवा इतर कुटुंबातील व्यक्तीचा पगार ह्या बाबी  बँक होम लोन देताना जमेच्या ठरतात त्यामुळे त्या कडे दुर्लक्ष करू नका.
🔰 कधी कधी शापित घर मिळतील असे योग ही पत्रिकेत असतात त्या मुळे घर खरेदीपूर्वी योग्य ती माहिती घेऊनच निर्णय घ्यावा.
🔰 कधी घर पहावे? , कुठे पहावे ? लवकर कर्जमुक्ती साठी उपाय ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिष शास्त्रा प्रमाणे सांगता येतात.
🔰 कुंटुबातील वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद हाच तुम्हाला वास्तू घेण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरतो.
अजूनही खूप काही ह्याबद्दल सांगता  येईल परंतु लेखनसीमेमुळे ईथे देता येणे शक्य नाही तरी आपल्याला पुढील माहिती हवी असल्यास कमेंट्स मध्ये जरूर कळवावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page