अशीच काहीशी परिस्थिती एका जातकाची झाली होती. केरळी समाजातील ते सद्गृहस्थ व्यवसायाने टेलर होते. शहरात स्वतः च्या मालकीची २ – २ दुकाने तीही ग्राहकांनी तुडुंब भरून वाहत होती. काम चोख असल्याने ग्राहक रेट मध्ये घासाघीस ही कधी करत नव्हते म्हणून नफा ही चांगला येत होता. एक श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणून पंचक्रोशीत नावारूपास आले होते.
मग प्रश्न काय होता त्यांचा?
धंदा गेल्या ८ महिन्या पासून धड चालत नाही? ग्राहकच टिकत नाहीत दुकानात, काही बाहेरची बाधा वगैरे आहे का जरा बघा?
जातकाची स्वतःची जन्मतारीख चुकीची / अंदाजे असल्याने मी नेहमीप्रमाणे प्रश्नकुंडली मांडली कारण ह्या वरून ही अचूक मार्गदर्शन करता येते. चालू महादशा व अंतर्दशा धंद्यासाठी अनुकूलच होती पण त्याचबरोबर पंचम, षष्ठ, नवंम आणी अष्टम स्थान ही कार्यरत होते. ह्यावरून जातकाची धंद्यातील अनुपस्थिती, नोकरांमुळे होणारे नुकसान दर्शविते.
मी विचारले ” तुमच्या कडे कामगार कोण सोडून गेलंय का सध्याच्या काळात?
गृहस्थ: नाही. सगळेच आहेत जुने लोक फक्त काही आजकाल काम नसल्यामुळे जरा लवकर घरी निघून जातात तेव्हढेच.
मी काय समजायचे ते समजलो.
काही उपाय देऊन त्यांना सांगितले की आपण आजकाल नेहमी दुकानात जात नाहीत असे दिसते तरी रोज न चुकता जात जा सोबत हे उपाय करा म्हणजे आपला धंदा नीट चालेल. बाधा वगैरे काही नाही. तुमची तुमच्या माणसानं कडूनच फसवणूक होतेय. त्यांना त्या वेळेस माझे बोलणे पटले नाही कारण सोबतचे कामगार गेल्या १०-१५ वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होते.
काही महिन्यांनंतर ते परत मला भेटावयास आले आता प्रश्न होता दुसरे घर कधी घेऊ याचा. मी सहज विचारले काय धंदा चांगला चाललाय ना?
जातक: हो, मस्तच पहिल्यासारखा! तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी रोज दुकानात हजेरी लावून नजर ठेवायचो आणि एक दिवस मला माहिती मिळाली की आमच्याच दुकानातील दोघे कामगार येणाऱ्या नवीन ग्राहकांना कपडे शिवण्याचा चालू रेट पेक्षा जास्त रेट सांगायचे व ग्राहकांच्या कानात कुजबुजायचे की “इथेही आम्हीच शिवतो पण तुम्हाला जर कमी रेट हवा असेल तर आमचं ही दुकान ह्या ह्या ठिकाणी आहे तिथे येऊ शकता.”
जेव्हा पासून त्या दोघांना कामावरून काढुन टाकलंय ग्राहकांची तर रीघ लागली आहे.
आपणासही असे काही अनुभव आपल्या धंद्यात आलेत का?
आपलेही विचार ऐकायला मला नक्कीच आवडेल.