देवळामुळे दशदिशा चैतन्यमय होतात. देवळात दर्शनाला गेल्याने आपल्याला तेथील सात्त्विकता ग्रहण करता येते आणि देवतेप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. भक्तीयोगानुसार आणि ज्ञानयोगानुसार देवळाचे महत्त्व याविषयीची माहिती आपण या लेखात जाणून घेऊ.
१. भक्तीयोगानुसार महत्त्व:
अ. देवळात दर्शनाला गेल्याने तेथील सात्त्विकता ग्रहण करता येते. तसेच तेथील सात्त्विक वातावरणामुळे देवतेप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते.
आ. देवळात पूजा, अभिषेक इत्यादी धार्मिक विधींच्या वेळी, तसेच आरतीच्या वेळी देवतेची पवित्रके (देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकण) देवतेच्या मूर्तीकडे मोठ्या प्रमाणावर आकृष्ट होतात. त्यामुळे त्या वेळी देवळात उपस्थित असलेल्या भाविकाला त्या पवित्रकांचा लाभ होतो.
इ. स्वयंभू किंवा जागृत देवस्थाने (उदा. बारा ज्योतिर्लिंगे), तसेच संतांनी बांधलेली देवळे यांमध्ये शक्ती आणि चैतन्य यांचे प्रमाण जास्त असल्याने अशा देवळांत दर्शनाला जाणे भाविकांना अधिक लाभदायक ठरते.
२. ज्ञानयोगानुसार महत्त्व:
‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: । दृश्याभावात् विमुच्यते ।’, म्हणजे ‘द्रष्टा (जीव) हा दृश्यामुळे बद्ध होतो आणि ज्या वेळी दृश्याचा अभाव होईल, त्या वेळी तो मुक्त होतो’, उदा. आवडीचा पदार्थ समोर दिसत असतांना तो खायची इच्छा होते, इतर वेळी तसे होत नाही. दृश्ये तर एकापाठोपाठ एक अशी येतच असतात. मग दृश्याचा अभाव केव्हा होणार ? त्या द्रष्ट्याला मुक्त होण्यास एकच मार्ग संभवतो आणि तो म्हणजे द्रष्ट्यापुढे अशी दृश्ये ठेवायची की, त्या दृश्यांशी बद्ध झाला असता त्याला मुक्त व्हायला साहाय्य होईल, म्हणजे त्याची वृत्ती तमातून रजात आणि रजातून सत्त्वात प्रवेश करत राहील. ज्या दृश्यांमुळे बद्ध असलेला द्रष्टा मुक्त होईल, अशांपैकी एक दृश्य म्हणजे ‘देवालय’. देवालयांत अध्यात्मवृत्तीला पोषक अशी ईश्वरावतारांच्या जन्मकर्मांचे आणि लीलांचे, तसेच त्याच्या भक्तांचेही गुणगान ज्यात केलेले आहे, अशी प्रवचने आणि भजने होतात. त्यांच्या श्रवणातून ऐकणार्यांचे मनन घडून त्याची परिणती निदिध्यासात होते आणि त्यामुळे आत्मसाक्षात्कार होण्यास साहाय्य होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
३. देवळामुळे दशदिशा चैतन्यमय होणे:
‘देऊळ हे प्रत्यक्ष ईश्वरी ऊर्जेचे आकर्षण, प्रक्षेपण आणि संचारण यांचे केंद्र असल्यामुळे देवळातून सतत ईश्वरी ऊर्जेचे आकर्षण होऊन ती सर्व दिशांत प्रक्षेपण करून सगुण रचनाक्षेत्रात संचारणाच्या माध्यमातून वायूमंडल आणि जीव यांची शुद्धी केली जाते.’
अ. अधोदिशा : ‘देवळाच्या पायाभरणीच्या वेळी करण्यात येणार्या शिलेच्या स्थापनेतून देवळाच्या अधोदिशेचे वायूमंडल चैतन्यलहरींनी युक्त होते.
आ. अष्टदिशा : देवळातील देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे अष्टदिशा चैतन्यमय बनतात.
इ. ऊर्ध्वदिशा : देवळाच्या कळसातून कारंज्याप्रमाणे प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे त्याच्या सभोवतालच्या परिसरातील ऊर्ध्वदिशेचे वायूमंडल शुद्ध होते. तसेच या लहरींमुळे दाही दिशांनी प्रवेश करणार्या वाईट शक्तींपासून गावाचे रक्षण होण्यास साहाय्य होते.’
अगोदरच्या माझ्या सर्व लेखांना आपला भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलेत, सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन घेतलेत त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
आजचा लेख आपल्याला कसा वाटला ते ही कंमेंट्स च्या माध्यमातून नक्की कळवा.