ज्या घरात भांडण होत नाहीत असं घर खरं तर दुर्मिळच. सासू-सुना, नवरा – बायको, भाऊ – बहीण यांची होणारी भांडणे ही खरं तर रोजचीच चहाच्या कपातल्या वादळा सारखी म्हणून त्याकडे जास्त लक्ष द्यायचे नसते. ती जशी पटकन सुरू होतात तशीच पटकन संपतात देखील.
पण रोज होणारी भांडणे, आरडाओरडा- मारहाण, ज्या भांडणामुळे शेजाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागतो अशी भांडणे ही खूपच वाईट मानावीत. जरी पोलीस कम्प्लेट करावी तरी त्रास आपल्याच व्यक्तीला होणार असतो किंबहुना स्वतः लाच त्रास होणार असतो म्हणून ती ही करता येत नसते.
✍ काही जातकांचे आता पर्यंत आलेले प्रश्न बघून एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या घरात वरील प्रमाणे तीव्र भांडणं होत असतात त्याना एक तर पितृदोष असतो किंवा अशा घरात देवाधर्माचे कार्य कधीच होत नसते. मागील २०-२५ वर्षांपासून ही ज्या घरात सत्यनारायण, वास्तुशांती, इत्यादी पूजा झालेली नसेल, श्राद्धकर्म दरवर्षी होत नसेल तर अशा घरांमध्ये खालील गोष्टी प्रामुख्याने घडताना दिसून येतात:
- घरातल्यांचे एकमेकांशी न पटणे,
- संतत्ती होण्यात अडथळे येणे,
- लवकर लग्न न जुळणे,
- ऐपत असून सुद्धा दुसरी वास्तू/ जमीन विकत घेता न येणे,
- आर्थिक स्थिती नीट न बसने अथवा खर्च जास्त प्रमाणात होणे,
- घटस्फोट घेण्याइतपत परिस्थिती तयार होणे,
- कर्ता पुरुषाचे व्यसन अतिप्रमाणात वाढणे, इत्यादी…
( कुंडलीत वरील घटनांचे योग उत्तम असून सुद्धा फळे वेळेवर मिळत नाहीत.)
काही काही घरात तर पैसा असतो, सर्वच कुटूंबीय उच्च शिक्षित असतात पण विज्ञानावर जास्त श्रद्धा असल्याने त्यांची देवावरची श्रध्दा उडून गेलेली असते.
देवाधर्माचे नाही केले तर कुठे बिघडणार आहे का? उगाच भटजींना दक्षिणा देण्यासाठी हे सर्व स्तोम शास्त्रात माजवले आहे अशी ही टीका करताना आढळतात. पण हेच लोक जेव्हा काही अघटित घडते तेव्हा बरोबर लाईनवर येतात. रोजचे उभे राहणारे कौटुंबिक बखेडे ह्यांना निस्तारता येत नाही आणि मग एव्हडी संपत्ती असून सुद्धा एकमेकांचे तोंड न बघता एका घरात किंवा सेपरेट राहण्याची नामुष्की येते अशा लोकांवर.
✍ हे सर्व टाळण्यासाठी खालील गोष्टी घरात नेहमी कराव्यात:
🔰 दरवर्षी पितरांचे श्राद्ध वेळेवर करणे
🔰देवाधर्माचे कार्य/ पूजा वर्षातून एकदातरी करावी.
🔰 रोज किमान सायंकाळी देवासमोर दिवा लावावा. ( तेलाचा की तुपाचा हा प्रश्न गौण आहे कारण आपापल्या परिस्तिथीनुसार दिवा लावू शकता त्यामुळे दैवी लहरी आपल्या घरात आकृष्ट होऊन सुख लाभते.)
🔰 रोज मन्त्र जप किंवा एखादे तरी स्तोत्र रोज मोठ्याने वाचावे म्हणजे मंत्ररूपी दैवी लहरी सम्पूर्ण घरात पसरून सर्वांचे मन शांत करतील, रक्षा करतील. काही यंत्रांची उपासना पण घरातले कलह मिटवण्यास उपयोगी असते.
🔰 जमेल तसे अन्न दान करावे मग ते पक्षी/ प्राणी/ मनुष्य असे कुणासही चालेल. त्या द्वारे भुकेलेला पोट भरल्यावर तुम्हाला चांगल्याच दुवा देईल व आपलीही भरभराट होईल. हेच असे दान आहे की त्याचा दुरुपयोग घेणारा शक्यतो करत नाही, नाहीतर जर आपले दान सत्पात्री केले नसेल तर त्याचे पाप दान करणाऱ्यालाच लागते.
🔰 गुरुचरित्र, गुरुगीता, नवनाथ भक्तीसार, साईबाबा, स्वामी समर्थ किंवा गजानन महाराजांची पोथी, दासबोध इ. चे पारायण जसे जमेल तसे नक्की करावे.
🔰 आईवडिलांचे आशीर्वाद रोज घ्यावेत.
🔰 कपटनीती ने न वागता नेहमी सहकार्याने वागावे.
🔰 एखादा घरातील व्यक्ती जरी चिडून बोलत असेल तरी त्याला लगेच प्रत्युत्तर न देता तासा-दोन तासांच्या अंतरानंतर उत्तर द्यावे म्हणजे जर चुकीचे कारण असेल चिडण्यामागे तर मधल्या वेळेत चिडणाऱ्याला ते उमगते व पुढे होणारा वाद विकोपाला ही जात नाही.