31 मार्चच्या लोकसत्तामध्ये बातमी वाचली की कोरोना व्हायरस च्या लॉक डाऊन मुळे काही व्यापारी लोकांनी अवैध स्यानिटायझर्स, फेस मास्क व इतर वस्तू बाजारातून एक गठ्ठा खरेदी करून मालाड मध्ये एका गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेल्या त्याचा काळाबाजार करण्यासाठी.
नागरिकांच्या फायद्याचीच गोष्ट झाली की अन्न व औषध प्रशासनानं वेळीच त्या शोधून सील केल्या व दोषींवर योग्य ती कारवाई ही केली, सध्या आरोपी तुरुंगाची हवा खात आहेत. असो…
पण असे योग खरंच असतात का एखाद्याच्या पत्रिकेत?
उत्तर ” हो” आहे.
जातकाला जर राहू ची दशा असेल तर मुळात त्याचा मेंदू नीट काम करेनासा होत असतो त्यात जर त्याला अष्टम स्थान, षष्ठ स्थानाची, इ. दशा जर चालू असेल तर कुठल्यातरी पार्टनर बरोबर मिळून तो अशा अवैध धंद्यात पडतो….पडतो तो कायमचाच!
“इज्जतही जाते आणि भांडवल ही!”
परत काही त्याला उठता येत नाही जर पुढील येणारी दशा वाचवणारी नसेल.
मला लक्ख आठवतंय की एक जातक माझ्या कडे गेल्या १०-११ वर्षां पासून ज्योतिष सल्ला घेण्यासाठी येत आहेत त्यानीही मला असाच एक प्रश्न विचारला होता.
प्रश्न होता की एक गुजराती होलसेल व्यापारी त्यांच्याशी पार्टनरशिप करू इच्छित होता.
कारण त्याच्या कडे टिप्स होत्या की कांदा भाव भडकणार आहे…
अगदी पार रु.१२० च्या पार जाणार म्हणून आणि जर माझ्या जातकाने रु. १० लाख भांडवल लावले तर ते त्या वेळेस कमीत कमी भावात कांदा घरेदी करून त्याचा साठा करतील आणि मार्केट भडकल्यावर तो दामदुप्पट भावाने विकून नफा कमवतील.
तुम्हाला काय वाटतं सर, करू का हा धंदा?
मला पूरेपूर शंका होतीच म्हणून मी त्यांची जन्मकुंडली ही बघितली व प्रश्नकुंडली मांडून ही उत्तर बघितले.
सदर जातकाला राहुचीच दशा चालू होती सोबत मंगळ सोबतीला म्हणजे धाडस करण्यासाठी जातक धजावणार वर जोडीला वर उल्लेखलेले योग ही…त्यातून सहीसलामत सुटणे कठीण दिसत होते.
म्हणून सल्ला दिला करू नका असला धंदा, तुमचे दहा गुंतवाल पण वीस ही जाऊ शकतात वकील आणि पोलीसांना मॅनेज करायला. हा फक्त दीड- दोन महिने चालेल व्यापार पण तुमचे ग्रहयोग काही योग्य नाहीत असलं बेकायदेशीर कृत्य करायला.
आपल्याला आठवतच असेल नुकताच कांद्याचा भाव वाढलेला थोडे दिवस पण सरकार बदलल्या वर प्रशासनाने धाडी टाकणं सुरू केलं. अखेर भाव आलाच गरीब जनतेच्या आवाक्यात.
(कुठल्याही सरकार बद्दल विरोधी भाव नाही हो मनात..पण जे घडलं तेच सांगतोय, तसे साठेबाजी करणं बेकायदेशीरच! )
नशिबाने माझ्या जातकाने सल्ला ऐकलेला.😊
जातकाला अशा दशा चालू असल्या की तो फक्त काही धंद्यात च अशी कृत्ये करतो असे नसते…
जरी एखादा व्यक्ती जिथे नोकरी करत असेल तिथेही तो काही ना काही उपद्व्याप करतच असतो. कुठे आर्थिक माहिती चोरतात व दुसऱ्या कंम्पनीस विकतात तर कुठे बनावट कागदपत्रे बनव तर कुठे कॉपीराइट, ट्रेडमार्क आर्टिकलच चोर, खोटी सही मार, इत्यादी.
(Paytm ची पर्सनल आसिस्टंट ही सुटली नाही त्यातून ….तुम्ही वाचली नसेल ती बातमी तर जुनी वर्तमानपत्र नक्की वाचा, समजेल)
परंतु जेव्हा काळ येतो तेव्हा अशा व्यक्ती निश्चितच पकडल्या जातात हे ही तितकंच सत्य!
म्हणून समोरच्याने कितीही मृगजळ दाखविले असले तरी जरा जपूनच बरं!😊