गेले कित्येक वर्षे मी कृष्णमुर्ती व भावनवमांश पद्धतीने अनेक जातकांसाठी कृष्णमूर्ती पद्धतीत सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे आलेल्या जातकाला कुठले शिक्षण घ्यावे, कुठला व्यवसाय करावा हे सांगत आहे परंतु पूजेच्या वेळी पुरोहितांकडून ऐकल्यावर जसे आपण “मम” बोलतो तश्याच प्रकारे ज्योतिष शास्त्राचा एक नियम बुद्धीस पटत नव्हता तो म्हणजे अष्टम स्थानावरून इंजिनिअरिंग जसे बघितले जाते तसेच occult science म्हणजे गुढविद्या ही बघितली जाते ते कसं आणि का ?
अष्टम स्थानाचा संबंध लोह, मशिनरी चा येतो म्हणून असे काही ग्रंथकारांचे म्हणणे होते पण मग गूढ विद्या का तर कालपुरुषाच्या कुंडलीत वृश्चिक ही गूढ तत्वाची रास येते म्हणून असावे कदाचित अशीच भावना प्रबळ झाली होती.
तरी कुठे कुठे मन विचार करत होत की आपण सांगितलेल्या फलादेशा प्रमाणे आजपर्यंत अनेक जातकांना लाभ झालाय हे त्यानी स्वतः च सांगितलं असलं हे खरं असलं तरी ते फक्त आपण कृष्णमुर्ती पद्धतीत दिलेल्या फक्त नियमांनी सांगू शकलो पण परस्पर विसंगत ह्या दोन गोष्टी का बरं सांगितल्या असतील अष्टम स्थानावरून ? त्याच्या मागची कारणे कोणती असतील ?
त्याचे उत्तर मला डॉ. श्री प. वि. वर्तक ह्यांच्या पुस्तकात सापडलं. तेच वाचकांना देण्याचा मानस म्हणून हा लेख लिहीत आहे. नवीन ज्योतिष अभ्यासकांस ह्याचा नक्की फायदा होईल ही आशा आहे.
उपनिषदांच्या मते ब्रम्ह व ब्रह्मा ह्या दोन वेगळ्या वस्तू आहेत. त्यात प्रथम पुत्र देवांमधील (परब्रह्म नाही) ब्रह्मा असून त्याचा जन्म परब्रह्माच्याच इच्छेनुसार झाला. ह्या ब्रह्मा ने विश्व उत्पन्न केले. आपण ब्रह्म व विश्व एकच समजतो पण ते खरे नाही. विश्व हे मर्यादित आहे तर ब्रह्म हे अमर्यादित आहे. कारण ब्रह्म हे अनेक विश्वाना सामावून आहे. त्यातील एका विश्वाचे कर्तृत्व ब्रह्मदेवांकडे आहे.
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर पृथ्वी व इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. हा सूर्य व हे ग्रह ह्याना मिळून एक सूर्यमाला बनते. अशा असंख्य सूर्यमाला मिळुन एक आकाशगंगा तयार होते त्यालाच विश्व म्हणतात व अशा अनेक आकाशगंगा(विश्व) मिळून ब्रह्म तयार होते.
चटकन समजण्यासाठी जरा आठवा की आपण सूर्य नमस्कार घालताना किती सुर्यांचे नाव घेतो ?
आता ह्यात उल्लेखलेल्या ब्रह्मास ह्या पूर्ण ब्रह्म चे ज्ञान होते ज्यास “ब्रह्मविद्या” म्हणतात.
ते ज्याने पुढे जाऊन आपल्या थोरल्या पुत्रास अथर्व ला शिकवली. ह्याच ब्रह्म विद्येस “सर्व विद्या प्रतिष्ठाम” असे म्हंटले आहे ते सर्वार्थाने योग्यच आहे.
ह्या विश्वाची कोडी उलगडायला जेव्हा कोणी शास्त्रज्ञ बसतात तेव्हा त्याना फक्त एकाच विषयात ज्ञान असून चालत नाही तर फीजिक्स, अटॉमीक एनर्जी, अस्ट्रोनॉमी, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, इत्यादी अनेक शास्त्राचे ज्ञान असणे गरजेचे असते. म्हणजे ज्याला ब्रह्म संबंधी ज्ञान होईल त्याला आपसुकच ह्या सर्व विद्या येतील. म्हणजे ब्रह्मविद्येत ह्या सर्व विद्या समाविष्ट आहेत. हा झाला ज्ञान योग.
म्हणजे आजचे शास्त्रज्ञ असे ज्ञानयोगी आहेत.
पण काय ब्रह्म जाण्यासाठी फक्त ह्या वरील विद्याशाखांचाच अभ्यास करावा लागतो तरच ब्रह्म जाणून घेता येते?
असे कदापि नाही. सामान्य मनुष्य सुद्धा ब्रह्म जाणून घेऊ शकतो त्यासाठी जाणून घ्यावी लागते “अध्यात्म विद्या”.
ती साध्य करणे म्हणजे अध्यात्म योग.
ते जाण्यासाठी फक्त दोन विद्या चे ज्ञान असणे अभिप्रेत आहे त्या म्हणजे:
१) परा विद्या,
२) अपरा विद्या
ब्रह्म हे वर सांगितल्याप्रमाणे अमर्यादित आहे म्हणून ज्याला मर्यादा नाहीत ती “परा विद्या” तर अपरा विद्या ही मर्यादित आहे. ज्याने अक्षर ब्रह्म कळते.
“अपरा विद्या” म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे ४ वेद + शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिषशास्त्र.
म्हणून करिअर गाईडन्स करताना अष्टम स्थानाचा संबंध जन्म कुंडलीत लागत असेल तर सर्व ज्योतिर्विद जातकांना सांगतात की तुम्ही इंजिनीअरिंग चा अभ्यास करा किंवा गूढ शास्त्रांचा अभ्यास करा. आता ह्यात ग्रहयोगाप्रमाणे कोणत्या विद्याशाखांचा अभ्यास करावा हे पूर्ण पत्रिका पाहिल्यावरच सांगता येते.
आपले ज्योतिष शास्त्र ही एक गूढ विद्याच आहे म्हणून की काय माझ्या “कृष्णमुर्ती व भाव नवमांश पद्धतीच्या” मार्च च्या नवीन ज्योतिष वर्गात सर्वात जास्त विद्यार्थी “इंजिनीअर” आहेत.
देश-विदेशातील जास्तीत जास्त इंजिनीअरना ज्योतिष शास्त्र विषयात का रस असावा ह्याचे कोडे आता आपल्याला नक्कीच उलगडले असेल.