आपणास माहिती आहे की सप्तम, पंचम व द्वितीय स्थानावरून विवाह योग पाहिला जातो. त्यात मुख्यत्वे रवी, शुक्र, गुरू ह्या ग्रहांचे कार्यकारण भावावरून विवाह कधी होईल हे सांगितले जाते.
परंतु कुठल्याही कारणाने पहिल्या विवाहाचा अंत झाल्यास जातक दुसऱ्या विवाहाचा विचार करतो. कुणीच फक्त स्वतःच्या तत्सम सुखासाठी द्वितीय विवाह करत नसतो तर पदरी असणाऱ्या अपत्याची काळजी पोटी अथवा जगाच्या वाईट नजरे पासून सुरक्षित राहण्यासाठी त्याची धडपड असते.
बऱ्याच जातकांचा असा प्रश्न असतो की पहिल्या विवाहात जे भोग भोगलेत तेच परत द्वितीय विवाहात नाही ना वाट्याला येणार नाहीतर आहे तसेच आपण बरे!
प्रश्न तसा रास्तच कारण ज्या व्यक्तीच्या आयुष्यात असे भोग आलेले असतात की त्यांना वाटत असते की जे भोग आपण भोगलो ते आपल्या दुश्मनाच्या ही वाट्याला कधीच यायला नकोत. कारण कोणाचं कुंकू बाळ जन्माच्या आधीच गेलेले असते तर कुणाला काही विचित्र कारणाने छळ/त्रास झाल्या मुळे घटस्फोट नाखुषीने घ्यावा लागलेला असतो, इ.
द्वितीय विवाह हा मुख्यत्वे करून पहिल्या लग्नाच्या अष्टम स्थानावरून बघितला पाहिजे. बुध, राहू ह्यांच्या कार्येशत्वा चा, येणाऱ्या महादशा, अंतर्दशा, विदिशां चा सखोल अभ्यास करून ज्योतिषाने द्वितीय लग्न सुखकारक की दुःख कारक होईल हे सांगायला हवं.
काही विशिष्ट ग्रहदशा घटना रिपीट करण्यात पटाईत असतात.त्या कुठल्याही शांती/ तोडगे करून जातक टाळू शकत नाही. कृष्णमूर्ती पद्धतींने कुठल्या काळात लग्न करू नये हे सांगता येते म्हणून कधी कधी ज्योतिषी ठराविक काळ विवाहासाठी अनिष्ट असल्याचे सांगतात. तरी पण राहु/बुधाच्या अमलाखाली असणारा जातक ज्योतिषाच थोडंच ऐकतो? जातकाला योग्य सल्ला दिला असेल तरी जातक अनिष्ट दशेच्या काळात लग्न करतोच. मुलगा/मुलगी आवडली म्हणून पत्रिका ही जुळविण्याची तसदी घेत नाहीत.
कालपरत्वे ग्रह आपला हिसका दाखवतातच. मग काय सगळा खेळ-खंडोबा!
माझ्या मते जातकाने द्वितीय विवाह करताना जरा जास्तच चिकित्सक रहायला हवं अगोदरच्या अनुभवावरून कारण येथे फक्त एकटे तुम्हीच नसता तर तुमच्या बरोबर असतो तुमच्या काळजाचा तुकडा!