कधी कधी जातकाला उत्तर देताना त्यांच्या मुलांशी पण बोलायचा योग येत असतो प्रत्येक ज्योतिर्विदाला.
तसाच एक आगंतुक पण थोडा हटके प्रश्न एका जातकाच्या घरातील मुलीने विचारला, “कनकधारा स्तोत्र” रोज मी वाचले तर मला ही पैसे मिळतील का ?
प्रश्न विचारणारी मुलगी सध्या कॉलेज मध्ये जात आहे, अजून शिकत असल्याने कोणत्याही प्रकारचा जॉब करत नाही पण जातकाच्या घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बिचारीला हा प्रश्न विचारावासा वाटला असावा.
परिस्थिती बेताची जरी असली तरी पालकांना तीने फक्त आता शिक्षणच घ्यावे असेच वाटत आहे म्हणून पार्टटाइम जॉब ही तिला करणे शक्य नाही.
आपल्याला माहीत असेलच की श्रीमद शंकराचार्यांनी हे स्तोत्र एका निष्कांचन ब्राह्मण कुटुंबातील व्यक्तीला धन मिळावे म्हणून श्री लक्ष्मी देवीची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्याने देवीची कृपादृष्टी त्या ब्राह्मण कुटुंबावर होऊन सदर स्तोत्राला देवीचा आशीर्वाद ही लाभला होता.
श्रीमद शंकराचार्य हे स्वतः महादेवाचाच अवतार होते हे आपणा सर्वांना नक्कीच माहीत असेल. त्यानी अनेक शीघ्रफलदायी स्तोत्र लिहिली आहेत, त्यापैकीच हे एक स्तोत्र “कनकधारा स्तोत्र”
✍ आशीर्वाद हा होता की जो कोणी भक्त ह्या कनकधारा स्तोत्राचा रोज पाठ करेल त्याला दर महिन्यात सोने घेऊ शकतो इतके धन प्राप्त होईल. ब्राह्ममुहूर्त वर जर तुपाचा दिवा लावून कमीत कमी तीन वेळा जो पठण करेल त्याला शीघ्र फलदायी होते असे विधान काही कडे नजरेस येते. वाचकांनी खरोखरच ह्या स्तोत्राचा पाठ करावा म्हणजे अडलेली कामे मार्गी लागून धनप्राप्ती होऊ शकेल. आपला आलेला अनुभव लेखकास नक्की कळवा.
नुसते स्तोत्र पठण केलं की झालं असं नसून त्याबरोबर कर्म पण करायला लागते, सहृदयता, दान देणे, गरजवंतास मदत करणे हे ही त्याबरोबर आवश्यकच आहे.
☀ आता आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया: त्या मुलीने विचारलेला प्रश्न विचार करायला लावणारा होता पण तिला समजावून देणेही आवश्यकच होते.
तिला सांगितलं, तू हे स्तोत्र वाचलेस की लगेच तुला धन प्राप्ती होणे शक्य नाही कारण तू सध्या जॉब/व्यवसाय करत नाहीस तर तू सध्या शिकत आहेस. पण जर तुला वाचायची इच्छा असेल तर नक्की वाच जेणेकरून त्या स्तोत्रामुळे तुझ्या घरच्यांना ह्याचा फायदा होईल आणि जरी तुला लक्ष्मी म्हणजे धन एवढेच माहिती असल्यास तसे नाही.
लक्ष्मीची अनेक रूपे आहेत. संपुर्ण विश्वात अष्टलक्ष्मी आराधना खूप प्रसिद्ध आहे.
☀ मुळात “महासरस्वती- महालक्ष्मी – महाकाली” ही देवीची तीन मूळ रुपं आहेत तरी सर्व रूपे म्हणजे एकच चैतन्य शक्ती आहे.
त्यापैकी महासरस्वती देवी तुला आता मदत करू शकेल. तुला अभ्यास करायला बळ व यश देईल. परीक्षेत उत्तम यश मिळाल्यास तुला एखादा चांगला जॉब/ व्यवसाय करूनही बऱ्यापैकी पैसे मिळवता येतील जेणेकरून तू तुझ्या कुटूंबाला हातभार लावू शकशील. पण, हे स्तोत्र वाचण्याबरोबर रोज अभ्यास करायला ही हवा हे ही सांगायला विसरलो नाही…