आपल्यावर आलेल्या आर्थिक संकटात कमीतकमी आपण हा प्रश्न विचारलात हे फार बरे झाले नाहीतर हल्ली वर्तमानपत्रात बातम्या वाचतोच की काही लोक अशा वेळी सरळ आत्महत्येचा प्रयत्न करतात जो कधीही उपयुक्त नसतो. कारण आत्महत्या करून आपले प्रश्न कधीच सुटत नाहीत उलट आपण आपल्या मागे राहिलेल्यांवर अनेक अनपेक्षित संकटेच थोपत असतो. तसेही आत्महत्या करणे हे हिंदू शास्त्रात व सध्याच्या कायद्यात गुन्हा मानला जातो.
अचानक चांगला चाललेला व्यवसाय मध्येच बंद पडतो. कधी कधी तुमची चूक असो की नसो बाहेरील घटनासुद्धा ह्यास जबाबदार होऊ शकतात. प्रमोशन मिळाच्या जागी नोकरीत नारळ मिळू शकतो. एखाद्यावर अगोदरच्या चांगल्या अनुभवाने आपण विश्वास ठेवून बऱ्याच किंमतीचा माल आपण उदार दिलेला असेल तर त्या व्यक्तीसच काही पर्सनल प्रॉब्लेम येऊन तो आपली रक्कम वेळेत न चुकवता आल्यामुळेही आपण आर्थिक संकटात जाऊ शकता.
इतकी उदाहरणे देण्याचे कारण म्हणजे आपल्या हातात काही नसते…आपण म्हणजे देवाच्या हातातील कठपुतलीच.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार जेव्हा व्ययेशाची, अष्टमेशाची, षष्ठ किंवा त्यांच्या नक्षत्रातील वा त्या स्थानातील ग्रहांची जेव्हा दशा चालू असते तेव्हा जातकाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. जेव्हा ते ग्रहमान बदलते तेव्हा कुठे आपल्याला योग्य मार्ग मिळून परत सुख दिसायला लागते.
श्री स्वामी समर्थांनी म्हटल्या प्रमाणे “हे ही दिवस जातील!”
– हे वाक्य नेहमी लक्षात ठेवून प्रयत्न करत रहा. हार मानू नये. समर्थांस किंवा आपण ज्या देवतेस/गुरुस आपण मानता त्याना शरण जावे…मार्ग नक्कीच मिळतो.
माझ्या अनुभवानुसार मी बरेच वेळा पाहिले आहे की आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्यास जातक ज्योतिषी, मांत्रिक, मुल्ला-मौलवी, चर्च चे फादर, इत्यादी लोकांकडे जात असतात.
कधी कधी अजून कर्ज काढून शांती- कर्मकांडे करून घेत असतात. त्यात गैर काहीच नाही परंतु माझे प्रांजळ मत आहे की अशा नाजूक परिस्थितीत शिल्लक पैसा राखून ठेवायचा की अशा तऱ्हेने खर्च करायचा ? शक्यतो राखून ठेवणेच चांगले.
अचानक कोणी घरात आजारी पडले, अनपेक्षित खर्च यासाठी तरी थोडी जमापुंजी नक्कीच राखून ठेवावी अन्यथा लाचारी पत्करावी लागू शकते.
उपाय करून धन मिळत नसते तर ते मिळते कष्ट करून – मग ते शारीरिक कष्ट असो की बौद्धीक.
म्हणून आपल्या आजूबाजूला कोणतेही छोटे-मोठे जादाचे काम मिळेल ते नक्की करा व प्रत्येक कामातून पैसे कसे मिळतील ते बघा.
अशा वेळी “सब दिन भगवान के” समजून ज्या दिवशी काम सुरू कराल तोच दिवस शुभ समजा. उगीच त्यासाठी मुहूर्त बघत बसू नका कारण अजून वाईट काय होणार ह्याची आपल्याला जाणीव झालेली असेलच.
रोज काम करून जेव्हढे पैसे महिन्याकाठी हातात येतील त्याच्या खर्चाची खालील प्रकारे विभागणी करावी:
१ ला भाग घरातल्या खर्चासाठी (साधारण ३५%)
२ रा भाग कर्जफेडी साठी (साधारण ५०%)
३ रा लहान भाग अनपेक्षित येणाऱ्या घटनांसाठी (१५%)
हे बजेट न चुकवता जेवढे कर्ज शिल्लक असेल ते फेडून टाकावे.
सर्वात प्रथम जास्त व्याजी कर्ज अगोदर फेडायचा प्रयत्न करावा (जसे की क्रेडिट कार्ड, गोल्ड लोन, प्रायव्हेट फ़ंडिंग मधून कर्ज)
जेव्हढे कर्जदार असतील त्याना सर्वांना शिल्लक रकमेने भागून थोडी का होईना परतफेड करावी म्हणजे समोरच्याचा विश्वास बसतो की सदर व्यक्ती ही आपली रक्कम परत करेल, बुडवणार नाही. असे केल्याने होणार परतफेडीचा तगादा ही आपण टाळू शकाल.
शक्य असेल तर बँकेतील कर्जाच्या मुदतीचे पुनर्रर्रचना करून घ्यावी त्याने आपला हफ्ता कमी होऊन मुदत वाढवता येते.
जर आपल्याकडे अगोदरच्या काही मुदतठेवी असतील तर त्या त्वरित मोडून कर्जातून मोकळे व्हावे.
आपल्या घनिष्ठ मित्रास/ सम-व्यवसायिकास आपली व्यथा सांगून त्याच्या कडून काही आर्थिक मदत मिळवून जास्त व्याजाचे कर्ज चुकवावे म्हणजे टेन्शन येणार नाही.
अशा अडचणीच्या काळात धंद्यात चुकूनही डिस्काउंट देऊ नये अन्यथा नामुष्की ओढवू शकते.
ग्राहकांना जास्त क्रेडिट पिरिअड ही देऊ नये नाहीतर आपले वर्किंग कॅपिटल धोक्यात येऊन चालणारा धंदा बंद पडू शकतो.
घरातील सर्व सदस्यांनी मिळून काही न काही अर्थजनाचे काम करावे म्हणजे एकावर लोड येणार नाही.
चैनीच्या वस्तू/ खर्च तूर्तास टाळावीत. उगीच श्रीमंत असल्याचा आव आणून खर्च करू नये.
जास्त देवपूजा, मंत्रजप ह्या काळात करू नये कारण जर फक्त देवपूजाच करत बसलात तर काम कधी करणार ?
श्री कृष्णाने सुद्धा सांगितले आहे की “आधी कर्म करा…”
हनुमान चालीसा, रामरक्षा, श्री सुक्त, नवग्रहस्तोत्र, शाबरी कवच, इत्यादी ह्या पैकी जे काही रोज कामाच्या वेळा सांभाळून वाचता येईल ते करा. त्याने बुद्धीला चालना मिळेल.
जवळ किंवा दूर नोकरी, कमी पगार/मोबदला जरी मिळत असेल तरी तो जॉब/धंदा स्वीकारा…आपले मीटर चालू राहणे महत्वाचे.
सर्व काही चांगलेच होणार आहे हे समजून पुढे जात रहा.
“लक्षात ठेवा, देवाला पण आपली काळजी असतेच!